मायबोली शीर्षक- गीतातील माझा सहभाग









डिसेंबर २०११ ची सुरुवात असावी.... एके दिवशी उल्हास भिडेंनी माझ्या विपुत : स्वयंसेवक हवेत - मायबोली शीर्षक गीत ही लिंक पाठवली. मी लगेचच तो बीबी उघडला अन सुरू झाला माझा, एक रोमांचक प्रवास ! प्रत्यक्षात हा "मायबोली शिर्षकगीता"चा प्रवास कितीतरी आधी सुरू झाला होता, यातला माझा सहभाग डिसेंबर २०११ पासूनचा.
मायबोली शिर्षक गीताचा प्रवास सुरू झाला तो; १० सप्टेंबर २०११ रोजी मायबोली शिर्षकगीत स्पर्धा -"ज्योतीने तेजाची आरती" जाहीर झाली तेव्हा.
त्याचा पहिला टप्पा गाठला गेला तो "ज्योतीने तेजाची आरती" - UlhasBhide या उल्हास भिडे यांच्या सुरेख काव्याने !
अन मग आला सुरेल टप्पा ! या कवितेला सुमधुर स्वरबद्ध केले ते योगेश जोशी (योग) यांनी !
आणि अनेक मायबोलीकरांनी तिला आपल्या सुरेल स्वरात ओवले.
आता वेळ होती तिला रुपात सजवायचे. अन त्यासाठी उल्हास भिडेंनी मला वरची लिंक पाठवली.
मी तिथे तयारी दर्शवली ती जरा भीत भीतच.
पण मग २०१२ वर्ष आले तेच मुळी एक आनंदाचे आव्हान घेऊन. ५ जानेवारीला 'रार' ची मेल आली. मायबोली शिर्षकगीताच्या दृकश्राव्य सादरीकरणात मलाही सहभागी करून घेतले होते. मी 'याहू' असे म्हटले अन सुरू झाला याहू अन जीमेल्सचा ओघ !
सुरुवातीलाच मला जाणवलं की आमची वेव्हलेग्थ जुळलीय. कारण उल्हास भिडेंना मी पाठवलेलल्या पहिल्या व्हिडिओत आकड्यांची सरस्वती लिहिली जातीय असे अ‍ॅनिमेशन मी पाठवले होते. अन रारने तयार केलेल्या व्हिडिओतही आकड्यांच्याच सरस्वतीचे चित्र तिनेही वापरले होते. तो पर्यंत आम्ही दोघी एकमेकींना ओळखतही नव्हतो. पण तरीही दोघी एकाच ट्रॅकवर होतो, म्हणतात ना "वाईज वुमेन थिंक अलाईक ! "
अन मग आम्हा दोघा आरतींचा ई-संवाद-सहसंवाद सुरू झाला. एकमेकींशी बोलताना आमचा मेल बॉक्स तुडूंब वाहू लागला. इतका की १० जानेवारी या फक्त एकाच दिवशी रारची मला २४ तर माझी तिला १६ मेल्स ! कधी आम्ही जी-चॅटवर बोलायचो, अन काम करायचो. एकमेकींच्या कल्पना, त्यांचे सादरी करण, त्यांचे अगदी सेकंदा-सेकंदांचे हिशोब या चर्चांमध्ये रात्रीचे १२-२ कधी वाजले ना तिला कळायचं ना मला कळायचं. खुप मजा आली हे काम करताना. तहान- भूक- झोप सारं काही विसरायला लावणारं काम मला पुन्हा करायला मिळालं तेही , या वयात
खरं पाहिलं तर अशा स्वरुपाचे माझे हे पहिलेच काम. दोन अर्थाने: अ‍ॅनिमेशनच्या संदर्भातही अन ऑनलाईन काही करण्याच्या संदर्भातही. मी पडले इतिहासाची अभ्यासक, मला हे 'ई-जग' नवीनच. अ‍ॅनिमेशनही मी नव्यानेच शिकलेय. (त्यातही वयाच्या पन्नाशीला काही नवीन शिकायचं म्हणजे जरा धाडसच ! ) अन त्यातून अमेरिकेतल्या रारशी एकीकडे ई-मेल्स नी संवाद साधायचा अन दुसरीकडे अनुभव नसलेल्या अ‍ॅनिमेशनमध्ये घुसायचे. मला सगळेच एकदम धाडसी वाटत होते. पण खरं सांगू या १०-१५ दिवसात मी पुन्हा तरूण झाले. आजच्या तरूण पिढीच्या आव्हानात्मक आयुष्याची झलकच या "शिर्षक गीताची झलक" ने मला दिली, मनापासून धन्यवाद मायबोली, उल्हास भिडे, रार आणि संबंधित सर्व, खरच मनापासून धन्यवाद !
या १०-१५ दिवसात जेव्हढे इंटेन्सिव्ह अ‍ॅनिमेशन मी केले तेव्हढं मी शिकत होते त्या अडिच्-तीन वर्षातही केलं नव्हतं. अन शेवटचा दिवस, छे रात्र तर विचारू नका
सोमवारी १६ तारखेला रारचा रात्री साधारण ९.३० वाजता फोन वाजला. अन माहिती नसलेला वेगळाच नंबर पाहून मी जरा विचारात पडले. अन एक गोड आवाज कानावर पडला , "मी आरती रानडे, रार बोलतेय..." मी थक्कच ! कारण सकाळीच ९.०० वाजता व्हिडिओ फायनल झाला होता. काही कारणांनी आम्हाला व्हिडिओची पहिली काही सेकंद अजून अ‍ॅनिमेशन करावे लागणार होते, त्या साठी आरतीने थेट अमेरिकेहून मला फोन केला.
मग आमची पुन्हा एक लढाई सुरू झाली - वेळ आणि अ‍ॅनिमेशनची
त्या रात्री जवळ जवळ १.३० वाजता माझ्या कडून शेवटची मेल रारला गेली.
दुसर्‍या दिवशी मी काही कौटुंबिक अडचणी अन कार्यक्रमात इतकी बिझी होते की हा व्हिडिओ लॉन्च झाला ते मला उल्हास भिडेंचा फोन आला तेव्हाच कळलं. दरम्यान रारची मेलही आली होती, पण मला संगणक उघडायलाच जमले नव्हते. शेवटी सगळी गडबड संपल्यावर संधाकाळी ७.१५ वाजता हा व्हिडिओ मला बघायला मिळाला, तेही सर्व माबोकरांच्या प्रतिसादांसह ! कित्ती छान वाटलं. इतक्या दिवसांची धावपळ भरून पावली ! खरच मनापासून धन्यवास अगदी सगळ्यांनाच ! अशी संधी मला इतरत्र कुठे मिळाली असती असं वाटत नाही ! मायबोली, उल्हास भिडे, आरती रानडे (रार) या सगळ्यांनी माझ्यावर इतका विश्वास दाखवला, काय बोलू ? मनापासून आभारी आहे मी तुम्हा सर्वांची !

No comments:

Post a Comment